मी आणि कविता
मी कधी आणि कशा कविता करायला लागले मला आठवत नाही. पण या कलेचं बीज कुठेतरी माझ्यात होतं एवढं नक्की, आणि माझ्या नशिबानं त्याला खतपाणी घालणारे बरेच जण मला भेटले.मला आठवतंय त्यानुसार, माझी स्वतःची अशी पहिली कविता मी सहावीत केली होती. त्याआधी मी शाळेत कविता केल्या असतीलही पण त्या आठवणीत नाहीत. माझी पहिली कविता मी मराठीचा गृहपाठ म्हणून केली होती. शब्दांची जुळवाजुळव करण्यासाठी आईची पण मदत घेतली होती; आणि ती कविता घरी इतकी आवडली की, मी एका रात्रीत महान कवयित्री झाल्याचा आनंद मला होत होता. बाकी कोणाला याबद्दल फार माहीत नव्हतं, पण मला आतून असं वाटायला लागलं की, मला माझ्या आयुष्यातला दागिना सापडला आहे. असा दागिना जो मी न घालतासुद्धा लोकं माझ्या सौंदर्याचं कौतुक करतील.
आणि आज तसंच झालं आहे. नातेवाईक व इतर ओळखीतली मंडळी कवयित्री म्हणूनच मला ओळखतात.
आपल्याला अचानक स्वतःतली एक कला नव्याने समजणं आणि नंतर त्याच्यामुळे लोकांनी आपल्याला ओळखणं, हा प्रवास मी अनुभवला. अजूनही अनुभवते आहे. कवितेमुळे मला मिळणारा आनंद अवर्णनीय आहे.
कवितेमुळे मला स्पर्धांमध्ये यश मिळालं. मला व्यक्त होण्यासाठी रंगमंच मिळाला. थोडाबहुत आदर आणि सन्मान मिळाला. माझ्यातला हरवलेला आत्मविश्वास मिळाला. माझ्या भावनांची आणि विचारांचीदेखील लोकांना कदर आहे हे बघून समाधान वाटलं. बऱ्याचदा मला काहीच जमत नाही असं वाटल्यावर 'कविता करणे' हीच माझी एकमेव ताकद बनली. माझ्यातील सामर्थ्य जागं करायला आणि माझी जिद्द वाढवायला कवितेची मोठी मदत झाली. एवढंच नाही तर दहावीचा अभ्यास करताना कित्येकदा मी खचले, पण तेव्हा कवितेनेच मला प्रेरणा दिली. आणि त्याचं उत्तम फळ मला मिळालं. अशा किती गोष्टी सांगू ज्या कवितेने मला दिल्या! यापुढे कवितेचा हात सोडणं आता माझ्या स्वप्नातही नाही.
माझ्या आयुष्यात कवितेची जागा महत्वाची आहेच पण ती आता माझी गरज बनू लागली आहे. माझ्या भावनांना आणि कल्पनाविश्वाला शब्दरूप देण्यासाठी मला कवितेचाच आधार घ्यावा लागतो.
आता कविता माझं सर्वस्व बनत चालली आहे.