पहिलं बक्षीस मिळाल्यानंतर माझ्यासोबत घरच्यांनाही असं वाटू लागलं की, मी अशाच विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत रहावं. काही महिन्यात नवी संधी चालून आली. दिव्य मराठी लिटरेचर फेस्ट चे आयोजन करण्यात आले होते. त्यातील बालकवी संमेलनात बालकवींना त्यांच्या कविता सादर करता याव्यात हा त्यामागचा उद्देश होता.
मी माझी पहिली कविताच वाचायचं ठरवलं. त्याहून चांगली कोणतीच कविता माझ्याकडे नव्हती. त्या कवितेला बक्षीस मिळाल्याने तिला एक वेगळा दर्जा (माझ्यामते) प्राप्त झाला होता.
कार्यक्रम सुरू झाला. प्रत्येकाने येऊन आपली कविता सादर केली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे कविता वाचन झाले. यापुढे खरी गंमत सुरू झाली. आयोजकांनी ऐन वेळेवर कविता स्पर्धा आणि निबंध स्पर्धा घेण्याचं ठरवलं. लहान व मोठा असे दोन वयोगट केले. आणि निबंध स्पर्धेचे 3 आणि कविता स्पर्धेचे 3 असे विषय सांगितले. तुम्हाला असं वाटेल की, मी खूप घाबरली असेल, पण असं काहीच झालं नाही. मला त्यांचा हा twist खूप आवडला होता. नवीन चॅलेंज असल्यामुळे मी खूप उत्साही होते. पण तो उत्साह खूप काळ टिकला नाही.😞 त्यांनी सगळ्यात महत्त्वाची सूचना केली. "कविता व निबंध लिहिण्यासाठी केवळ 15 मिनिटे वेळ दिलेली आहे." इतक्या कमी वेळात कविता करणं म्हणजे मोठं दिव्यच काम होतं! पण कविता तर लिहायचीच होती, म्हणून मी सगळ्यात सोपा विषय निवडला - फुलपाखरू! पहिली 5 मिनिटं मला काही सुचत नव्हतं. मग खूप विचार आणि शब्दांची जुळवाजुळव करून काही ओळी सुचल्या आणि मी लिहीतच गेले.....कविता संपेपर्यंत.!
फुलपाखरू
एकदा अंगणात विचार करत बसले होते.
आभाळाकडे मान उंचावून आशेने बघत होते.
एक तरी कविता सुचू दे मला,
कोमल हातातली दिसू दे कला.
विषय काही सुचत नव्हता
झाले होते त्रस्त
कंटाळा आला होता
खूप खूप जास्त
तेवढ्यात डोळ्यासमोरून एक पाकळी उडाली
झटकन माझी नजर तिच्याकडे वळली
कोण आहे ते पाखरू मला काही कळेना
त्यातून मला कवितेची ओळ सुद्धा सुचेना
पाच-दहा मिनिटातच माझे डोळे चमकले
कवितेचे विषय झरकन आठवले.
त्यातलाच एक विषय घेऊन म्हटलं कविता करू,
ठरलंना मग कवितेचा विषय - 'फुलपाखरू' !
माझा स्वतः वर विश्वासच बसत नव्हता. याआधी मला कधीच वाटलं नव्हतं की मला इतक्या कमी वेळात एवढी चांगली कविता सुचेल. ( त्यानंतर मी बऱ्याच चांगल्या कविता केल्या ही गोष्ट वेगळी.. पण तेव्हा माझ्यासाठी हीच कविता Best होती.) कविता तर लिहून झाली, पण तिला बक्षीस मिळेल याची काही खात्री नव्हती. कारण कविता फक्त मला आवडून चालणार नाही, ती परीक्षकांनाही आवडायला हवी. पुढे काय होईल या विचाराने जीव नुसता खाली-वर होत होता.
शेवटी एकदाचे परीक्षक उठले आणि निकाल वाचून दाखवू लागले. पण कविता स्पर्धेच्या विजेत्यांमध्ये माझं नाव कुठेच नव्हतं. मला थोडं वाईट वाटलं. पण मी स्वतःची समजूत घातली. मग परीक्षक पुन्हा कविता स्पर्धेच्या विजेत्यांची नावे वाचू लागले. मला काही कळेच ना! मग एकदम ट्यूब पेटली. स्पर्धेसाठी लहान आणि मोठा दोन गट केले होते! आधीची ३ नावे लहान गटातल्या मुलांची होती. माझा पडलेला चेहरा पुन्हा टवटवीत झाला. आश्चर्य म्हणजे परीक्षकांनी पहिलं नाव माझंच घेतलं. बापरे! कविता लिहायला घेतली तेव्हा अशक्य वाटणारी गोष्ट होती ही! जवळजवळ १५ - २० मिनिटांचा हा काळ; पण तेवढ्या वेळात मी काय काय विचार केला, किती वेगवेगळ्या भावना माझ्या मनात येऊन गेल्या. खरंच, हा अनुभव काही औरच होता.
लेखन- ईरा कुलकर्णी