भाग २
पहिली राज्यस्तरीय स्पर्धा.... आणि त्यासाठी लिहिलेली माझी पहिली कविता!! माझ्यासाठी हा खूपच आनंदाचा क्षण होता.कविता लिहून वेळेत जमा केली, पण पुढे त्याचा काय निकाल लागला हे जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक होते.एकीकडे 'पहिल्याच प्रयत्नात बक्षीस मिळेल.या भावनेत वाहून जाऊ नकोस.'असं मनाला समजावत होते आणि दुसरीकडे 'पहिले ३ नंबर नाही पण उत्तेजनार्थ बक्षीस तरी मिळेल मला.'असेही विचार मनात येत होते.मी निकालाची आतुरतेने वाट बघत होते.
अखेर तो दिवस उजाडला.ताईंनी ज्या मुलांना बक्षिसं मिळाली आहेत त्यांची नावे सांगितली. त्यात माझेही नाव होते!!
मग काय, नुसता जल्लोष.माझा आनंद गगनात मावत नव्हता.पहिल्या प्रयत्नात सगळ्यांनाच यश मिळतं असं नाही. पण मला ते मिळालं होतं आणि त्यासाठी मी सर्वात जास्त खुश होते.
बक्षीस समारंभाचा दिवसही माझ्या आयुष्यातला एक भन्नाट दिवस होता.अविस्मरणीय! मलाच अचंबित करणारा.
त्यादिवशी दुपारी माझी होमी भाभाची लेखी परीक्षा होती.ती परीक्षा व्यवस्थित झाली पण तिथून निघायला मात्र मला उशीर झाला.तोपर्यंत बक्षीस समारंभ सुरू झाला होता.मी परीक्षा केंद्रावरून थेट बक्षीस समारंभाला जायला निघाले. मला खूप उशीर झाला होता. तेवढ्यात आयोजकांकडून फोन आला. ते म्हणाले,'तुम्ही येत आहात न,आम्ही तुमच्यासाठी थांबलो आहोत.' ते शब्द मी ऐकले आणि मला हायसं वाटलं.ते माझ्यासाठी थांबले आहेत हे ऐकून माझी भीती,टेंशन आणि अस्वस्थता कमी झाली होती.आम्ही घाईघाईतच तिथे पोहोचलो.ज्या मुलांना बक्षिसं मिळाली होती, त्यांना त्यांची बक्षीसप्राप्त कविता वाचण्याची संधी मिळणार होती.मी पोहोचले तेव्हा सगळ्यांच्या कविता वाचून झाल्या होत्या. मला हे माहीत नव्हते.त्यांनी मला पोहोचल्या पोहोचल्या ही सूचना दिली आणि मी स्टेजवर गेले. एवढ्या मोठ्या स्टेजवर मी एकटी.... समोर खूप मान्यवर आणि इतर बरीच अनोळखी मंडळी बसलेली. का? फक्त माझी कविता ऐकण्यासाठी!१ मिनिट सगळीकडे शांतता पसरली. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि शक्य तितक्या आत्मविश्वासाने आणि खणखणीत आवाजात कविता सादर केली. माझी कविता संपल्यावर झालेला 'तो' टाळ्यांचा कडकडाट मला अजूनही आठवतो.
आता बक्षीस वितरणाची वेळ होती. पुन्हा एकदा माझी धडधड वाढली. माझे कान माझं नाव ऐकायला आसुसले होते.आणि त्या स्पर्धेत मी द्वितीय क्रमांक पटकावला! बक्षीस घेताना मी प्रेक्षकांमधे बसलेल्या माझ्या कुटुंबियांकडे बघितलं.प्रत्येकाचे चेहरे आनंदाने तेजळले होते.त्यांच्या डोळ्यात अभिमान आणि कौतुक काठोकाठ भरलं होतं. आणखीन काय हवं होतं मला!
पण तो दिवस इथेच संपला नाही. मी बक्षीस घेऊन कितीही समाधानी झाले असले तरी,त्यदिवशीचं मला मिळणारं एक surprise अजून बाकी होतं.
आम्ही त्या हॉलमधून बाहेर पडलो.सगळे आनंदात गप्पा मारत होते.मला समोर राजीव तांबे उभे असलेले दिसले. मी जागच्याजागी थिजले. मी लहानपणापासून ज्यांच्या गोष्टी वाचल्या त्यांना भेटायची संधी मला मिळत होती! मग आम्ही त्यांच्याशी बोललो. मी त्यांना माझी कविता वाचायला दिली.त्यावर ते म्हणाले,"छान केलीस कविता!" बास इतकच. पण माझ्यासाठी तेसुद्धा खूप होतं.मला इतका आनंद झाला की माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं.त्यांच्यासोबत फोटो काढून आम्ही त्यांचा निरोप घेतला.
खूप छान
ReplyDeleteआमच्यासाठीही तो दिवस अविस्मरणीय होता
ReplyDeleteमस्त लिहिलयस ईरा..
ReplyDeleteThanks😊
Deleteमस्तच ईरा ..... अशीच छान लिहीत रहा ....
ReplyDeleteThank you!☺️
Delete